शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१३

मला जगायचंय !

पुन्हा कधी तरी जाग आली ..... शरीर कशात तरी गुंडाळलेले .....हळू हळू नजर वर केली मला कळून चुकले मी इस्पितळात आ. य. सी. सी. यु. मध्ये आहे फक्त डोळ्यांची हालचाल शक्य ... डोक्यात विचारांचे काहूर माजलेले.... डोक्यात घणांचे घाव पडतायत.....
घरुन निघालो तेव्हाच रेनकोट घालायला हवा होता माझी बाईक पुलावर आली आणि पाऊस तांडव करत बरसू लागला. बाईक बाजूला उभी करून डिकीत ठेवलेला रेनकोट काढेपर्यंत मी साफ भिजून गेलो होतो......
तेवढ्यात मागून रो रो करीत येण्यारया ट्रकचा आवाज ......अरे हे काय मी अलगद हवेत तरंगतोय ..... माझी बाईक ची सुद्धा तीच गत..... मग विजेच्या खांबाला मीठी मारली खांदा, छाती बधीर.... तिथून खाली डिव्हायडरवरिल दगडावर डोके आणि मग पाठ आपटली .....संपूर्ण शरीतर विजेचा कल्लोळ, जणू आकाशातील वीज माझ्या शरीरात घर करून राहिलीये.... अणुंकुचीदार सुई टोचल्या प्रमाणे पाऊस शरीरात खोलवर घुसत होता .... कपड्यावरील चिखल आणि रक्त साफ धुवून काढत होत .... जोरात किंकाळी मारावी असे वाटत होत पण नाही शक्य झाले....निपचित पाठीवर पडून किती वेळ झाला कोणास ठाऊक.
कोणीतरी हाताला धरतय मनगट दाबतय …
"नाडी अजून मंद आहे."
" हो सर रात्री दोनदा डोळे हि उघडले होते पण थोडाच वेळ, पुन्हा ग्लानी आली."
" ठीक आहे. बहुतेक पुढचे १ ० / १ २ तास वाट पहावी लागेल मग धोका नाही. "
हे देवा! ते काय म्हणतायत म्हणजे अजून मृत्यूशी झुंज चालू आहे म्हणायची तर !
अरे हे काय अजून हि मी इस्पितळातच…. पण आता चांगले कळायला लागलय …. ती काय दरवाजाच्या काचेतून माझी पत्नी माझ्याकडेच डोळे लावून बसली आहे. रडून रडून तीचा चेहरा लाल झाला आहे तिचे डोळे सुजलेले दिसत आहेत…किती दिवस ती तिथून हलली नसेल… आमची नजरानजर झाली… ती दीनवाणी हसली आणि तिच्या डोळ्याला पुन्हा झरझर लागली …. मी डोळे मिटून एक आवंढा गिळला तेव्हा माझे दोन्ही कानावरील पट्ट्या ओल्या झाल्या...म्हणजे मीही रडत होतो….
आयुष्याच्या या प्रवासात मी अर्ध्या वाटेवर तिला आणि सोन्याला सोडून जाईन अशी धास्ती तिने नसेल ना घेतली.....
मला लग्नाचा दिवस ते आत्तापर्यन्तचा सर्व प्रवास आठवला… " आयुष्याच्या सर्व प्रसंगात एकमेकांना साथ करू" अशा शपथा आंम्ही लग्नाआधीही किती वेळा घेल्या होत्या…. मग आता का मी एवढा कृतघ्न झालो होतो,स्वार्थी झालो होतो.... तिला अर्ध्या वाटेवर सोडून निघून चाललो होतो....
माझ्या शिवाय सोन्याला घेवून ती कशी काय या संसाराचा गाढा हाकणार होती … मुलाला मोठे करून डॉक्टर / इंजिनेर करण्यासाठी एकटीच काबाडकष्ट करणार होति... माझ्या म्हातारया झालेल्या आई बाबांना सांभाळणार होती….
पुन्हा मी डोळे उघडले…. आता काचे पलीकडे तिच्या बरोबर माझा सोनुल्या पण तिच्या कडेवर होता … एक हात हलवून माझ्या कडे बघत राहिला…. जणू मला बाहेर बोलावत होता ज्याच्या अंगा खांद्यावर वर मी उड्या मारल्या तो बाबा असा निपचित कसा पडलाय?… असा प्रश्न त्याला बिचार्याला पडला असणार …....