मंगळवार, १ जानेवारी, २०१३

गाडीतला तो ...

शनिवार असल्याने गाडीला तुरळक गर्दी होती.  पुढील स्टेशनावर मला उतरायचे असल्याने मी दरवाजातच उभा होतो. एवढ्यात माझ्या बाजूला दोन्ही पायाने अपंग असलेला एक तरुण मुलगा आपली चारचाकी ढकलगाडी (Trolly )घेवून दरवाजाजवळ येवून बसून राहिला. त्यालाही पुढील स्टेशनावर उतरायचे होते. आता डब्यातील सर्वांचे लक्ष त्या मुलाकडे लागले होते काहीजण कुतूहल म्हणून तर काहीजण चिंता म्हणून. कारण जे  त्याच्या मागे येवून उभे राहिले होते ते हा कधी उतरणार आणि त्यानंतर मग आपल्यला कधी उतरायला मिळणार याच  चिंतेत होते. त्याला मात्र त्याची फिकीर नव्हती,  तो बिनधास्त होता. आपल्याला मिळालेली चिल्लर रक्कम हातात खुळखुळवत बाहेरील पळणारी दृश बघत होता. आता गाडीचा वेग मंदावला कारण  पहिला डबा  स्टेशनात शिरत होता. 

तसा तो पैसा खिशात ठेवून उतरण्यास सज्ज झाला. एक हात दरवाजाला धरून एका हातात त्याने ढकलगाडी (Trolly ) घेतली. गाडीचा वेग आता हळूहळू कमी होत असतानाच त्याने विजेच्या चपळाईने फलाटावर ढकलगाडीसकट उडी मारली आणि ती ढकलगाडी आपल्या बुडाखाली ठेवून तो तिच्यावर स्वार झाला आणि आम्ही सर्व उतरे पर्यंत हाताने रेटा देत पुढील डब्याकडे रवाना झाला.  आता त्या डब्यातील सर्व माणसे चढून झाल्यावर त्याने त्याच चपळाईने उलट क्रिया केली आधी त्याने ढकलगाडी आत ठेवली व मधल्या खांबाचा आधार घेत त्याने आपले बूड आत टेकले. आणि हा प्रकार फक्त २० ते २५ सेकंदात झाला.  कारण प्रत्येक फालाटा वर गाडी एवढा वेळच थोड्या फार कमी अधिक फरकाने थांबते. धडधाकट पाय असून सुद्धा ज्यांना  गाडीत निट चढता उतरता येत नाही तिथे हा अपंग मुलगा सराईत पणे आपला प्रवास या मुंबईच्या धकधकीच्या आणि धक्का धक्कीच्या जीवनात रोज करतो. आपल्या रोजच्या रोजीरोटीसाठी सगळेच जन मेहनत करत असतात. याच जगण्यासाठी त्याची चाललेली धडपड, जिद्द आणि उमेद याला माझा सलाम !  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा